ठामपाचा अर्थसंकल्प हा मूलभूत सुविधांचा नाही तर सुखसुविधांचा ! सुधीर भगत

ठामपाचा अर्थसंकल्प हा मूलभूत सुविधांचा नाही तर सुखसुविधांचा ! – 

सुधीर भगत यांनी आयुक्तांना दिला एक हजार कोटींच्या उत्पन्न वाढीचा मूलमंत्र

ठाणे –  स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या परिक्षेत्रातील गोरगरीब जनतेचे जीवनमान उंचवायला हवे. त्यासाठीच अर्थसंकल्प मांडण्यात येत असतो. मात्र, ठाणे महानगर पालिकेकडून मांडण्यात आलेला अर्थसंकल्प हा उच्चभ्रूंना सुखसुविधा पुरविणारा आहे. मूलभूत सुविधा पुरवणारा नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत यांनी लगावला. तसेच, एक हजार कोटी रूपयांच्या उत्पन्न वाढीचा मुलमंत्रही भगत यांनी दिला.

ठाणे महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पावर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. या चर्चेत सुधीर भगत यांनी प्रशासकीय यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला.

सुधीर भगत यांनी आपल्या 20 मिनिटांच्या भाषणात, ठामपाच्या उत्पन्न वाढीवर भर तर दिलाच शिवाय मूलभूत सुविधांबाबत दाखविलेल्या अनास्थेवरही भाष्य केले. ते म्हणाले , मुंब्रा प्रभाग समितीमध्ये शंभरच्या आसपास नवीन अनधिकृत इमारती आहेत. या इमारतीत राहणारे लोक पालिकेच्या सर्व सुविधा वापरत आहेत. मात्र, त्यांना करआकारणी करण्यात आलेली नाही. या इमारतींना कर आकारणी करण्यासाठी मे. स्थापत्य कन्सल्टन्सी या कंपनीला कंत्राट दिले आहे. मात्र, कर आकेरणीचे स्पष्ट आदेश दिलेले नाहीत. जर पाणी आणि कर आकारणी केली तर सुमारे 100 कोटीची गंगाजळी ठामपाच्या तिजोरीत जमा होईल. ठामपाच्या 9 प्रभाग समित्यांमध्ये अशी कार्यवाही केली तर 900 कोटी रूपयांचे उत्पन्न ठामपाला मिळेल. शिवाय, रस्ते रुंदीकरण आपण केले आहे. पण, पार्किंग धोरण आपण आखलेले नाही. हे धोरण जर आखले तर आताच्या 35 कोटी उत्पन्नात थेट 65 कोटींची भर पडून ते 100 कोटींवर जाऊ शकते. याचा विचार ठामपा आयुक्तांनी केलाच पाहिजे.
मुंब्रा , खारीगाव परिसरात नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी देताना 1 % सेस कर मेट्रोच्या नावाने आकारला जात आहे. अद्याप या भागातील मेट्रोचा विचारही केला जात नाही. इंटर्नल मेट्रो असो अगर इतर कोणती नवीन वाहतूक व्यवस्था यावर विचार केला जात नसताना जर गेली 15 वर्षे असा कर आकारला जात असेल तर ते योग्य आहे का? आजही मुंब्रा, कळव्यातील नागरिकांना थेट पनवेल गाठायचे असेल तर एसटीशिवाय पर्याय नाही. म्हणजे आम्ही अजून 20 व्या शतकातून बाहेरच पडलेलो नाही. मुलभूत सुविधांसाठी आपला संघर्ष असला पाहिजे. पण, तो होताना दिसत नाही. मुख्य ठाण्यात तीन तीन नाट्यगृह होत आहेत. पण, मुंब्रा, दिवा येथे साधी ड्रेनेज व्यवस्थेत सुधारणा करता येत नाहीत, हे योग्य आहे का? ठाणे शहरात तीन उड्डाणपूल,  सॅटिस होत असताना ज्या भागातून बुलेट ट्रेन जात आहे. त्या परिसराचे सुशोभिकरणही केले जात नसेल तर काय, तिथे परिवहनचा डेपोही नाही. एकूणच  हा अर्थसंकल्प म्हणजे उघड्या माणसाला कपडे देणारा नसून ठिगळ लावणारा आहे. म्हणूनच “जंगल जंगल बात चली है, पता चला है; चड्डी पहन के फुल खिला है… , अशीच अवस्था झाली आहे, असेही भगत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!